Blog Details

माझे आवडते मोबाईल अॅप्स

Posted on - 2025-07-08

साधारणतः २०१४ मध्ये मला iphone घ्यावा असे अनेक वेळा वाटत असे. पण त्याची किंमत आणि माझा पगार यात खूप मोठी तफावत असल्याने तो विकत घेण्याची हिम्मत कधी झाली नाही. आय फोनमधील वेगवेगळ्या अँप्सबद्दल माझा नायजेरियातील सहकारी भरभरून सांगायचा. मला त्याबद्दल कुतूहल वाटत असे. नायजेरियात असताना iphone घेणे शक्य होईल असे वाटले. iphone घेण्याची माझी इच्छा मी माझ्या सहकार्याला बोलून दाखवली. तो लगेच म्हणाला, “डॉक्टर सहाब, मै आपको iphone दिलवा देता हूँ ” आम्ही लगेच कलाबारमधील iphone च्या दुकानात गेलो आणि iphone विकत घेतला. मी ‘apple’ नावाच्या एका नवीन विश्वात प्रवेश केला. जणूकाही अल्लाउद्दीनचा चिराग माझ्या हातात आला आहे असा भास मला झाला होता. iphone बॉक्समधून बाहेर काढला आणि सुरु केला. स्क्रीनवर लहान चंद्रकोरीएवढे कापलेल्या पांढऱ्या रंगाचे सफरचंद असलेला लोगो बघताना हरवून गेलो. माझ्या मित्राने त्या माझे iphone मध्ये माझी माहिती भरली आणि वापरण्यास सज्ज झाला. मग त्याने मला त्यातील ऍपबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली. काही महत्वाचे ऍप डाऊनलोड केले आणि ते वापरायला शिकलो. अनेक वर्षांपासून मनात येत असे की दररोज व्यायाम करावा, मेडिटेशन करावे, इंग्लिश व गणित हे विषय पुनश्च एकदा अभ्यासावेत इ. मी हे माझ्या मित्राला सांगितले. तो हसत म्हणाला, ‘इस फोनमें सब के लिये ऍप है.’ त्याने “daily App advice” हे एक ऍप डाउनलोड करून दिले. ऍप स्टोअरमधून विविध ऍप कसे डाउनलोड करायचे तेसुद्धा शिकवले. मी दररोज विविध अँप्स डाउनलोड करायचो आणि मग नको असतील ते काढून टाकायचो. एक दिवस “daily App advice” मध्ये ‘elevate’ नावाचे भारी ऍप सापडले. गणित आणि इंग्रजी हे विषय म्हणावे तेवढे चांगले नाहीत याची खंत सदैव मनात होती. इंग्रजीचा शब्दसंग्रह चांगला असावा, गणितं सहज करता यावीत असे वाटत असे. गुणाकार, भागाकार, टक्केवारी पटकन यायला हवी त्यासाठी प्रत्येक वेळी कॅलक्युलेटर कशाला असे अनेक वेळा वाटायचे. Elevate हे ॲप मिळाले आणि त्यामध्ये हे सर्व काही होते. अगदी सहज साध्या दररोजच्या सरावा मुळे व या ॲपमधील नावीन्यपुर्ण अशा शब्द कोड्यांमधून मी परत गणित आणि इंग्रजी हे विषय वयाच्या चाळीशी मध्ये शिकायला सुरवात केली आणि त्याचा मला खूप फायदा झाला. दररोज फक्त १० मिनिटे सराव करून मी या दोन्ही विषयात advanced लेव्हलपर्यंत पोहोचलो आहे. ध्यानधारणा या विषयाबद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल होते. ऐकले बरेच होते पण ते नेमके कसे करायचे हे माहीत नव्हते. योग वर्गात प्रवेश घ्यावा व शिकावे असे अनेक वेळा मनात येत असे. पण वेळेअभावी ते शक्य झाले नाही. मी ॲप स्टोअरमध्ये शोधले असता मला Headspace हे एक उत्तम ॲप मिळाले. दीर्घ श्वसन, विचारांकडे तटस्थ राहून बघणे, मनात येणाऱ्या विचारांची नोंद करणे व ते केवळ विचार आहेत वास्तविकता नाही हे समजून घेणे अशा अनेक गोष्टी या ॲपमध्ये मला शिकता आल्या. यात सर्वात आवडलेली ध्यानाची पध्दत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत निर्माण होणाऱ्या संवेदना अनुभवणे व त्याकडे तटस्थतेने पाहणे हेही शिकायला मिळाले. या ॲपमध्ये अगदी एक मिनिटांपासून ते एक तासाचे ध्यानाचे विविध प्रकार आहेत. मि. ॲंन्डी आणि त्यांचे सहकारी हे विविध ध्यानाचे प्रकार उत्तम पद्धतीने शिकवतात. कुठे क्लासला जायची गरज नाही. घरात बसून अभ्यास आपल्या वेळेत करता येतो. या ॲपमधील निरभ्र निळे आकाश आणि त्यावर आलेले काळे ढग हे ॲनिमेशन मला खुप काही शिकवून गेले. आपले मन स्वच्छ निरभ्र आकाशासारखे असते. अधूनमधून निराशा, संताप, उदासीनता असे काळे ढग येतात. त्यात पण पाऊस पडून गेला की मन नावाचे आकाश परत निरभ्र स्वच्छ होते. मागच्या काही वर्षात या ॲपच्या मदतीने मी १८,७०८ मिनिटे ध्यान धारणा केली आहे. ध्यानधारणा शिकलो पण “व्यायाम” ही न आवडणारी पण चांगली असणारी सवय अंगवळणी पडावी असे अनेक वेळा वाटत असे. व्यायामशाळेत जाण्याचे प्रयोग करून बघितले पण वेळ आणि पैसा वाया जातो असे वाटत होते. त्यामुळे व्यायामाचे प्रयोग बंद पडले. ॲप-स्टोअर मध्ये 7-Seven हे ॲप सापडले आणि व्यायाम दररोज सुरू झाला. त्यात केवळ सात मिनिटे १२ प्रकारचे विविध व्यायाम करायचे होते. या ॲपमध्ये त्याचे उत्तम प्रात्यक्षिक दाखवले होते त्यामुळे ते सहज शिकता आले. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे केवळ ७ मिनिटात व्यायाम पूर्ण होतो.या ॲपच्या सहाय्याने मी आजपर्यंत १३८९ प्रकारचे व्यायाम पूर्ण केले आहेत आणि 220 तास व्यायाम केला आहे. दररोजच्या केवळ सात मिनिटांच्या ह्या सवयीचा मला खूप फायदा झाला आहे. माझ्या लहान मुलाने नुकतेच Chess हे ॲप मला दिले. डाऊनलोड केले आहे. त्याच्याबरोबर मी आता नव्याने बुद्धीबळ शिकायला सुरुवात केली आहे. या अशा विविध प्रकारच्या ॲप्समुळे माझे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली आहे. -राजेश कापसे,

Leave a Comment